श्रीवर्धन | श्रीवर्धनमध्ये केलेल्या सभागृहाच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणार्या बांधकाम विभागातील उपअभियंता डॉ. प्रवीण मोरे याला गुरुवारी (२३ जानेवारी) रायगड आणि ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने अटक केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील एक सभागृहासाठी सात लाख रुपयांचा ठेका तक्रारदाराला देण्यात आला होता.
सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून १ लाख ४० हजाराचे बिल मंजूर करण्यात आले होते. परंतू या बिलासाठी उप अभियंता डॉ. प्रवीण मोरे याने १३ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबतची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. खात्री केल्यानंतर गुरुवारी (२३ जानेवारी) लाचलुचपत विरोधी पथकाने सापळा रचला होता.
या सापळ्यात १० हजारांची लाच घेताना प्रवीण मोरे याला रंगेहात पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, संतोष भिसे, विनोद जाधव, सचिन आटपाडकर, शशिकांत पाडावे यांच्या टिमने या कारवाईत सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे, संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे, सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे आहेत.