रायगडच्या पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा

By Raigad Times    01-Feb-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेनाराष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या वादावर दोघांत तिसरा... असा तोडगा निघाला असून रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले. त्यानंतर रायगडकरांना पालकमंत्र्यांची प्रतिक्षा आहे.
 
शिवसेना शिंदेगटाचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यातील पालकमंत्रिपदावरील वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचे पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी नवी मुंबईतील भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा सुरु होती.
 
तर शुक्रवारी दिवसभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देण्यात आले होते. मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. या स्थगितीनंतर भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना पहायला मिळाला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस वरुन आल्यामुळे याचा निर्णय लवकर होईल, अशी अपेक्षा रायगडकरांना आहे.