अलिबाग | छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी केली जात असताना, ‘छावा’ फेम अभिनेता विकी कौशल किल्ले रायगडावर पोहचला होता. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला त्याने अभिवादन केले. यावेळी त्याच्यासोबत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, अनिकेत तटकरे उपस्थित होते. ‘छावा’ सिनेमामुळे अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत असून त्याला प्रेक्षकांसह चाहत्यांचे मोठे प्रेम मिळत आहे.
या सिनेमामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी अभिनेता विकी कौशल बुधवारी (१९ फेब्रुवारी) किल्ले रायगडावर आला होता. यावेळी विकी कौशलने ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मला याठिकाणी येण्याची संधी मिळाली, रायगडावर येण्याचे माझे एक स्वप्न होते.
दर्शनाची ओढ होती आणि आज महाराजांचे आशीर्वाद मिळालेत. म्हणून खूप भारी वाटतंय’ अशी भावना त्याने व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छाही त्याने यावेळी दिल्या. ‘छावा’ सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सोसल्या आहेत, त्यापुढे आमची मेहनत काहीच नाही. त्यामुळे महाराजांची कथा जगासमोर मांडण्याची गरज असल्याचेही मत त्याने व्यक्त केले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने हजारो शिवभक्त किल्ल्यावर दाखल झाले होते. घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले होते. सर्वच उत्साहाचे वातावरण पहायला मिळत होते.