उरण | उरण तालुक्यातील ६ हजार ७५१ ग्राहकांकडे महावितरणची २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत तीन कोटी ३९ लाख ९० हजार ५३७ रुपये थकीत आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार मोहीम सुरू केली असून ७२५ ग्राहकांवर तात्पुरता वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी दिली.
उरण तालुक्यात वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण ६७ हजार ९११ ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती ५५ हजार ८००, वाणिज्य ७ हजार ५५०, औद्योगिक ६८० ग्राहकांचा समावेश आहे. यापैकी घरगुती ५ हजार ४९० ग्राहकांकडे एक कोटी १७ लाख ५० हजार ५२९, औद्योगिक ग्राहकांकडे एक कोटी ६४ लाख २४ हजार ११९.२२, वाणिज्य १ हजार १७१ ग्राहकांकडे ५८ लाख १५ हजार ८८७.९८ अशी एकूण ६ हजार ७५१ ग्राहकांकडे महावितरणची २० फेब्रुवारी पयर्र्ंत तीन कोटी ३९ लाख ९० हजार ५३७.८८ रुपये थकीत आहेत.
यापैकी थकित असलेल्या ७२५ ग्राहकांना थकीत बीलांची रक्कम जमा करण्यासाठी वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही बीले भरण्यास दिरंगाई करणार्या ७२५ ग्राहकांवर तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिले वसुलीसाठी सक्तीची मोहीम हाती घेतली आहे.