दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरु असताना आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
श्रीवर्धन तालुक्यात जवळपास दीडशे गाव खेडी आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयात भरमसाठ लुटमार सुरु असते. परिणामी, शासनाने गरिबांसाठी ग्रामीण भागात सुरु केलेले सरकारी रुग्णालये ओस पडत आहेत. याचाच फायदा घेऊन भरडखोल, दिघी, बोर्लीपंचतन, काळसुरी, आदगाव, वडवली परिसरामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.
शहरातील नामवंत डॉक्टरांच्या हाताखाली दोन ते ३ वर्षे कम्पाउंडरची नोकरी करून त्यानंतर हेच कम्पाउंडर ग्रामीण भागात जाऊन डॉक्टरी व्यवसाय करतात. काही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले मात्र, नियमानुसार नसलेले बोगस प्रमाणपत्र घेऊन ग्रामीण भागात आपला डॉक्टरचा व्यवसाय करताना दिसून येत आहेत. या बोगस व्यवसायापासून आर्थिक कमाई होत असली, तरी अशा बेकायदेशीर उपचारामुळे गोरगरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
शहरात जाऊन महागडा उपचार घेण्यापेक्षा जर गावातच कमी पैशात उपचार होत असल्याने अशिक्षित गोरगरीब गावातच उपचार घेतात; मात्र अनेक वेळा चुकीचा उपचार होऊन त्या रुग्णांवर विपरित परिणाम होतो व नंतर त्या रुग्णाला शहरात जाऊन महागड्या दवाखान्यात इलाज करावा लागतो. बोगस डॉक्टरांचा हा व्यवसाय जवळपास सर्वच खेडेगावात चालत आहे; परंतु त्यात् या गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नसतात.
आरोग्य अधिकारी गप्प का?
श्रीवर्धन तालुक्यात ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय सुरु असताना जिल्हा आरोग्य अधिकारी गप्प का आहेत? कारवाई का करत नाहीत? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
बोगस डॉक्टर कारवाईबाबत तालुकास्तरावर नेमणूक समितीतील आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी
बोगस डॉक्टर कारवाई संबंधित माहिती घेऊन सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तपासी कामात डॉक्टरांची माहिती घेऊन वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. - संतोष नारायण कर, तालुका आरोग्य अधिकारी
तालुक्यातील डॉक्टरांची कागदोपत्री तपासणी होणे महत्वाचे आहे. यावर नियंत्रण ठेवणारी कमिटी झोपेचे सोंग घेऊन बसली आहे. त्यामुळेच बोगस डॉक्टरांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे. त्यामुळे चौकशी करुन, कारवाई व्हावी. - धवल तवसाळकर, वेळास