अलिबाग | सुधारीत संच मान्यतेस राज्यभरातून शिक्षक आणि त्यांच्या संघटनांनी विरोध दर्शवला आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडच्यावतीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिले आहे. राज्य शासनाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार यावर्षी केलेल्या सुधारीत शिक्षक संचमान्यतेमुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सदर सुधारित संचमान्यता निकषाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने संच मान्यतेस विरोध केला आहे. प्राथमिक शाळांचे संच मान्यता सध्या २०२४-२५ च्या सुधारित निकषानुसार सुरू आहे. या संच मान्यतेमध्ये १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार झालेल्या बदलाच्या अनुषंगाने कारवाई करताना अनेक शिक्षकांची पदे रिक्त ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर २० पेक्षा कमी पटसंख्या असणार्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकही शिक्षक मान्य होत नाही; परिणामी अनेक पदवीधर शिक्षकाचे रिक्त ठरण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
पूर्वी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकसंख्या निर्धारित होती. नव्या निकषानुसार विद्यार्थी संख्या वाढविण्यात आली आहे; परिणामी अनेक शाळांना अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक उपलब्ध होणार असल्याने राज्यात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.जल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संच मान्यता सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. १५ मार्च २०२४ या शासन निर्णयानुसार ही कार्यवाही होत आहे. यात विद्यार्थी संख्येनुसार काही बदल करण्यात आले आहेत.
या नवीन शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीपर्यंत साठी १ ते २० पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक व नंतर दुसर्या पदावर आवश्यकतेनुसार विद्यार्थी संख्या उपलब्ध झाल्यास सेवानिवृत्त शिक्षक देण्यात येणार आहे. २० ते ६० विद्यार्थी संख्या पटसंख्या असल्यास दोन शिक्षक मिळणार आहेत. तर ६१ ते ९० पटसंख्या असल्यास तीन शिक्षक मिळणार आहेत; मात्र पूर्वीच्या शासन निर्णयानुसार ६१ पटसंख्या झाली की तिसरा शिक्षक उपलब्ध होत असे; मात्र आता ही विद्यार्थी संख्या किमान ७६ झाल्याशिवाय तिसर्या शिक्षक मिळणार नाही.
चौथ्या शिक्षकांसाठी पूर्वी ९१ ही विद्यार्थी संख्या ग्राह्य करण्यात आली होती, ती आता १०६ करण्यात आली आहे. सहावी ते आठवीसाठी २० ते ७० विद्यार्थी संख्या असल्या दोन शिक्षक तर ७१ ते १०५ विद्यार्थी संख्या असल्यास तीन शिक्षक मिळत होते. पूर्वी ७१ विद्यार्थी संख्या झाल्यावर तिसरा शिक्षक उपलब्ध होत असे; मात्र आता ८८ विद्यार्थी संख्या झाल्याशिवाय तिसरा शिक्षक उपलब्ध होणार नाही.
त्यानंतर १०५ विद्यार्थी संख्येच्या पुढे प्रति ३५ विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक मिळणार आहे. याच निकषानुसार सध्या संच मान्यतेबाबत ऑनलाईन कार्यवाही होत असताना २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शून्य शिक्षक दाखविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीमधील या त्रुटीमध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संच मान्यता करताना ऑनलाईनमध्ये येत असलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याबरोबरच १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासनाने केलेले बदल पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागा शाखा रायगडच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, प्रसिद्धीप्रमुख वैभव कांबळे, रायगड जिल्हा अध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार मार्गदर्शक नरेंद्र गुरव जितेंद्र बोडके, सुशील वाघमारे, उमेश महाडेश्वर, कार्यकारी अध्यक्ष निलेश साळवी, प्रफुल्ल पवार, बालाजी गुबनरे, संजय पोईलकर, देवानंद गोगर, निलेश वारगे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.