राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम २.० विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ

By Raigad Times    11-Mar-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम २.० विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ नुकताच पालीतील राजिप शाळा क्र. १ येथे करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सन २०१६ पासून कार्यरत असून यामध्ये ०-१८ वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते.
 
सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम २.० विशेष मोहीम तालुकास्तरीय शुभारंभ सोहळा रायगड जिल्हा परिषदेच्या पाली येथील शाळा क्रमांक १ येथे सुधागड पालीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी मुंढे, सीडीपीओ प्रतिनिधी एस. ए. लखिमळे यांच्या हस्ते संपन्न झाला.
 
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असून सदर कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले.