मोबाईल फोनवरून हाणामारी; माथेरान येथे एकाची हत्या

By Raigad Times    15-Mar-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | माथेरान शहरात असलेल्या मध्य रेल्वेचे विश्रामगृहात काम करणार्‍या कामगाराचा खून झाला आहे. विश्रामगृहात काम करणार्‍या तीन कामगारांमध्ये मोबाईल फोन करुन हाणामारी झाली आणि त्यात दोघांनी चाकू हल्ला करुन तरुणाचा खून केला आहे. याप्रकरणी माथेरान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. माथेरान शहरात मध्य रेल्वे प्रशासनाने अधिकारी विश्रामगृह आहे.
 
ते विश्रामगृह मध्य रेल्वेने ठेकेदारी तत्वावर चालविण्यास दिले असून सध्या तेथे येणारे अधिकारी आणि पाहुणे यांच्या दिमतीला चार कर्मचारी ठेकेदाराकडून ठेवण्यात आले आहेत. होळी सण साजरा होत असताना तेथे ठेकेदाराचे कर्मचारी असलेल्या चार पैकी तीन जणांमध्ये मोबाईल फोन देण्यावरून हाणामारी झाली. १३ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी तीन तरुण भांडू लागले आणि शेवटी सुशांत सुनील गेजगे या २६ वर्षीय मित्रावर त्याच्या दोन मित्रांनी चाकूने हल्ला केला.
 
या हल्ल्यात सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी तेथे असलेला चौथा तरुण त्याला वाचवायला गेला असता त्यालादेखील किरकोळ जखम झाली. त्या घटनेची माहिती माथेरान पोलीस यांना मिळाली असता पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना पकडून पोलीस ठाण्यात नेले आहे. माथेरान शहरातील बाजारपेठेत असलेल्या त्या रेल्वे अधिकारी विश्रामगृहात होळी सण साजरा होत असताना, हाणामारी होत असताना स्थानिक लोकांना शुक्रवारी सकाळपर्यंत कोणतीही माहिती नव्हती.
 
सकाळी रेल्वे विश्रामगृह येथे पोलीस आल्याचे पाहून काय घटना घडली? याची माहिती मिळाली. सुशांत गेजगे या तरुणाचा खून झाला असल्याने पोलीस उपअधीक्षक डी डी टेले हे माथेरानमध्ये पोहचले असून त्यांनी या खुनाच्या तपासाला गती देण्याचा प्रयत्नकेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माथेरान स्टेशन प्रबंधक आणि विश्रामगृह ठेकेदार यांच्याकडून काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी खूनप्रकरणी साक्षीदार यांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तर चाकू हल्ला करणारे दोघे तरुण यांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.