नवीन पनवेल | टँकर आणि एटिवा स्कुटीच्या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुना मुंबई पुणे हायवे पनवेलकडेजाणार्या लेनवर कोनगाव येथे घडली. शोभित सतीश सालुजा, जुई शोभित सालूजा आणि लाडो शोभित सालूजा (राहणार सेटर १८, कामोठे) अशी तिघांची नावे आहेत.
एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलगा या तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. १४ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास यातील शोभित सालुजा हे पत्नी आणि मुलगा यांच्यासह खोपोलीकडून पनवेलकडे ऍटिवा स्कुटी क्रमांक एम एच ४६ बी एल ४४९६ वरून प्रवास करत होते.
त्यांची एटिवा स्कुटी गोल्डन नाईट बार समोरील कोनगाव जुना मुंबई पुणे हायवे पनवेलकडे जाणार्या लेनवर आली असता त्यांच्या समोरून जाणार्या टँकर क्रमांक एम एच ०४ केएफ ७४१७ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील टँकरने अचानकपणे वळण घेतले. यावेळी टँकरचे चाक एटिवा स्कुटीला लागल्याने तिघेही टँकरच्या चाकाखाली आले.
आणि झालेल्या अपघातात शोभित सालुजा, जुई सालूजा आणि लाडो सालुजा हे जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती न देता चालक पळून गेला. झालेल्या अप- घाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी गहिनीनाथ कुंडलिक गर्जे (राहणार आष्टी, बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.