परतीच्या प्रवासात चाकरमानी रखडले... मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

By Raigad Times    17-Mar-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे कोकणातून शिमगा करुन परतणारे प्रवासी तासन्तास अडकून पडले होते. माणगाव ते इंदापूर हे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते.शिमगोत्सव साजरा करुन हजारो चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न येऊ नये, यासाठी रविवारी महामार्गावर कशेडी ते खारपाडादरम्यान अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती.
 
मात्र तरिही वाहनांची संख्या वाढल्याने, माणगाव ते इंदापूर परिसरात वाहनांच्या आठ ते दहा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र बेशिस्त वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने, वाहतुकीचे नियमन करणे कठीण जात होते.
 
दोन्ही बाजूला वाहनांच्या दुतर्फा रांगालागल्या होत्या. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बाह्य वळण रस्त्याची कामे सध्या रखडली आहेत. त्यामुळे अरुंद रस्त्यातून मार्गक्रमण करत या दोन्ही शहरातून वाहनांना जावे लागत आहे. अरुंद रस्ता आणि बाजारपेठांमधील गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे दोन्ही बाह्य वळण मार्गांची कामे नवीन ठेकेदार नेमून तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावातील दोन तरुणांच्या दुचाकीला खासगी बसची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू झाला. राहुल श्रीरंग साळुंखे (वय २७) व सिध्देश गणेश सकपाळ (वय २३) अशी या मृतांची नावे आहेत. हे दोघे गावातून मंदिराच्या लाईट बंद करण्यासाठी जात होते.