नवीन पनवेल | पनवेल तालुयातील चिपळे येथील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झालेले असून लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन ते नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
१९७५ मध्ये बांधलेल्या चिपळे येथील पूल धोकादायक झाल्यानंतर नवीन पुलासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सद्यस्थितीत ग्रामीण भागात लोकवस्ती प्रचंड वाढलेली आहे. विविध भाषिक मोठ्या संख्येने नेरे, विहिघर, उमरोली, वाजे आदी परिसरात राहत आहेत.
चिपळे येथील पूल १९७५ साली बांधण्यात आला आहे. त्याचे आयुष्यमान पन्नास वर्षे असल्याने व सद्यस्थितीत या पूलाला ४९ वर्ष पूर्ण झालेली आहेत. सध्याच्या चिपळे पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी दुसरा पूल होणे गरजेचे होते. नवीन होणार्या पुलाच्या बाजूला सिमेंट काँक्रेटचा रस्ता देखील बनवण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पूलाचे ८० टक्के काम पूर्ण झालेले असून पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु आहे.