दिघी-मुंबई एसटीतून धूर; घाबरलेल्या प्रवाशांच्या बसमधून उड्या

By Raigad Times    18-Mar-2025
Total Views |
 Murud
 
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथून मुंबईतील वडाळाकडे निघालेल्या एसटीच्या चालक केबिनमधून अचानक मोठ्याप्रमाणात धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावारण निर्माण झाले होते. प्रवाशांची गाडीबाहेर पडण्यासाठी धावाधाव झाली. अनेकांनी खिडक्यांमधून उड्या घेतल्या. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. दिघी बसस्थानकातून दिघी-वडाळा ही गाडी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते.
 
रविवारी (१६ मार्च) एसटीत होळीच्या उत्सवानंतर परतीच्या प्रवासात निघालेल्या चाकरमान्यांची हाऊसफुल गर्दी होती. दिघी सोडल्यानंतर मेंदडी स्थानकावर गाडी थांबली. पुन्हा पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी अचानक या गाडीतून धूर येऊ लागला. गाडीमध्ये सर्वत्र धूर झाल्याने प्रवासी घाबरले. त्यानंतर प्रवासी भयभीत होऊन मिळेल त्या वाटेने गाडीच्या बाहेर पडू लागले. दरवाजात गर्दी झाल्याने काहींनी खिडक्या व चालक केबिनमधून उड्या मारल्या.
 
या घटनेने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडीतून सर्व प्रवासी उतरल्यानंतर काही वेळाने धुराचे लोट कमी झाले. गाडीतील इंजिन जवळील पार्टमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या दिवसांत जिल्ह्यामध्ये वाहनांना आग लागण्याच्या चार धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.श्रीवर्धन आगाराच्या नादुरुस्त वाहनांच्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भितीचे सावट आहे.
 
एक तर कित्येक वर्ष नवीन गाड्यांची सुविधा नाही. नियमित लांब पल्ल्याच्या सोडण्यात येणार्‍या गाड्यांची देखभाल दुरुस्ती नसून, आता तरी सुखकर प्रवास मिळावा, अशी मागणी श्रीवर्धनवासी करत आहेत. दरम्यान, स्टार्टरमधील बिघाडामुळे आतील पार्ट जळून धूर निघाला आहे. या घटनेने प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. आगाराकडून सुरक्षित प्रवास देण्याचे नेहमी प्रयत्न केले जातील, असे आवाहन श्रीवर्धनचे आगारप्रमुख महेबुब मनेर यांनी केले आहे.