राज्यात २१६.६१ कोटी रुपयांची प्रलंबित मजुरी अदा - मंत्री भरत गोगावले

By Raigad Times    19-Mar-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | राज्यात प्रलंबित असणारी रोजगार हमीची २१६.६१ कोटी रुपयांची मजुरी अदा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रोहयो मंत्री गोगावले बोलत होते. रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले की, १०० दिवसांपर्यंतची मजुरी राज्य शासनाच्या निधीतून दिली जाते.
 
राज्य शासनाच्या निधीतून दिली जाणारी मजूरी १०० टक्के अदा करण्यात आली आहे. तर शंभर दिवसांच्या वरील मजुरी ही केंद्र सरकारकडून आलेल्या निधीतून देण्यात येते. अद्यापपर्यंत केंद्र सरकारचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे उर्वरित मजुरी राज्य शासनाच्या निधीतून देऊन केंद्र सरकारचा निधी आल्यानंतर तो राज्य शासनाकडे वर्ग करण्याच्या पर्यायाविषयी विभाग विचार करत असल्याची माहितीही गोगावले यांनी यावेळी दिली.