रायगड जि.प.चा अर्थसंकल्प सादर ८५,८५,८५,००० ग्रामीण विकासासाठी रुपयांची तरतूद

By Raigad Times    19-Mar-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ८५ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी सादर केला. गतवर्षीपेक्षा हा अर्थसंकल्प ५ कोटी ५ लाख ५ हजार रुपये अधिकचा झाला आहे. अभिजात मराठी ही थीम या बजेट पत्रिकेची ठेवण्यात आली होती.मंगळवारी (१८ मार्च) जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
 
मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी तो कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड सुपूर्द केला. जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ आणि तळागाळातील घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे, मुख्य कार्यकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
 
या अर्थसंकल्पात इमारत व दळणवळण कामांसाठी २० कोटी ७४ लाख १७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सामान्य प्रशासन २ कोटी ४० लाख, शिक्षण ७ कोटी १६ लाख ११ हजार, पाटबंधारे १ कोटी २९ लाख, सार्वजनिक आरोग्य २ कोटी ५२ लाख, ग्रामीण पाणी पुरवठा ११ कोटी ९० लाख, कृषी २ कोटी ९२ लाख, पशुसंवर्धन ३ कोटी ४५ लाख, समाजकल्याण १३ कोटी २८ लाख, दिव्यांगकल्याण ३ कोटी ३२ लाख, महिला व बालकल्याण ६ कोटी ६४ लाख, १८ संकीर्ण ४ कोटी २८ लाख, ग्रामपंचायत २ कोटी २८ लाख तसेच अर्थसंकल्पात इतर बाबींसाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
 
यावेळी अतिरिक्त म. का.अ. सत्यजीत बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, लेखाधिकारी सतिश घोळवे व शहाजी भोसले तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खाते प्रमुख व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

alibag
 
विशेष योजना..
*नवीन रस्त्यांसाठी - १० कोटी २१ लाख
*जिल्हा परिषदेच्या जागांचे संरक्षण - १० लाख
*लहान पुलांच्या दुरुस्तीसाठी - १ कोटी
*बंधारे देखभाल व दुरूस्तीसाठी - ७८ लाख
*राजिप प्राथमिक शाळांना सोलार सिस्टीम व सीसीटीव्ही पुरविणे - १ कोटी ९५ लाख
*प्राथमिक शाळांना वॉटर फिल्टर - २० लाख
*प्रथमोपचार पेटी पुरविणे - २४ लाख ९८ हजार
*रुग्णवाहिका इंधन व दुरुस्तीसाठी - ५० लाख
*कृषी उत्पादकता वाढविणेसाठी - ३० लाख
*नारळ/सुपारी झाडावर चढण्याचे स्वयंचलित यंत्र पुरविणे - ५ लाख ९४ हजार
*अतितीव्र दिव्यांगांना निर्वाह भत्ता - ३० लाख
१६८ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प
सन २०२४-२५ चा १६८ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्पदेखील मंगळवारी मांडण्यात आला. मार्च २०२४ मध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ८० कोटी ८० लाख ८० हजार रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. सन २०२४-२५ चा अंतिम अर्थसंकल्प हा मूळ अर्थसंकल्पापेक्षा ८७ कोटी ५१ लाख ७० हजार रुपयांनी अधिकचा झाला आहे.
 
पाणीपट्टी उपकराचे ४९ कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाल्याने मूळ अर्थसंकल्पापेक्षा हा अधिकचा फरक दिसून येतो. असे असले तरी मूळ अर्थसंकल्पानंतर प्रथम सुधारित अर्थसंकल्पाने ३७ कोटी ५० लाख (अनुशेषासह) व द्वितीय सुधारित अर्थसंकल्पाने रक्कम रु. ३९ कोटी ४५ लाख इतकी तरतुद मूळ अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली. सबब तत्वतः मूळ अर्थसंकल्पापेक्षा अंतिम अर्थसंकल्प हा केवळ ११ कोटीने अधिक असल्याचे दिसून येते.