माथेरानमध्ये कडकडीत बंद , बाजारपेठेत शुकशुकाट; पर्यटकांचे हाल

By Raigad Times    19-Mar-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | माथेरान पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांची दस्तुरी नाका येथे फसवणूक केली जाते. अशा एजंटवर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारपासून माथेरान बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे. या बंदमुळे बाजापेठेत शुकशुकाट पहायला मिळाला. पर्यटकांचेदेखील हाल झाले. माथेरान बंदमुळे बाजारपेठ, ई-रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर नेरळ माथेरान टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आल्या असून आदिवासी लोकांनीदेखील माथेरान बंदला पाठिंबा दिला आहे.
 
माथेरानमध्ये रविवारी राहिलेले पर्यटक हे आपल्या घरी परतत होते. त्याचवेळी येणार्‍या पर्यटकांना नेरळ तसेच दस्तुरी येथे माथेरान बंद असल्याची माहिती मिळत असल्याने बहुसंख्य पर्यटक हे परतत होते. त्यात शहरात कुठेही कोणत्याही प्रकारचे खाद्य उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होणार असल्याने पर्यटकांनी माथेरानला येण्याचे टाळल्याचे दिसून आले.
 
KARJT
 
माथेरान पर्यटन बचाव समितीच्या माथेरान बंदला पाठिंबा देण्यासाठी शहरातील सर्व व्यावसायिक नागरिक हे श्रीराम चौकात एकत्र जमले होते. नेरळ माथेरान टॅक्सी सेवा अडकलेल्या पर्यटकांना माथेरान येथून खाली नेरळपर्यंत आणण्यासाठी सुरु होती. मात्र ई-रिक्षा सेवादेखील बंद ठेवण्यात आली होती. आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जैतू पारधी यांनी चालता येत नसताना काठीचा आधार घेऊन माथेरान गाठले आणि ‘माथेरान बंद’साठी आदिवासी समाजाचा पाठिंबा जाहीर केला.
 
बंद काळात माथेरानमधील मध्य रेल्वेची मिनीट्रेनची सेवा कोणत्याही अडथळ्याविना सुरू होती. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस माथेरान पोलिसांच्या मदतीला आले होते.त्यामुळे सर्वत्र पोलिसांचा खडा बंदोबस्त दिसून येत होता. तर पोलीस अधिकारी अनिल सोनोने यांच्याकडून शहरातील कोणत्याही पर्यटकाला आंदोलकांचा त्रास होऊ नये, यासाठी नोटीस बजावली होती. त्यात आंदोलन काळात घोडे सहभागी नसल्याने आणि त्यांच्याकडून व्यवसाय सुरू असल्याने अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आज महत्वाची बैठक
माथेरान बंद ठेवण्यात आल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असून हा बंद शासनाने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. शहरातील सलोखा तुटण्याची शक्यता असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाला बैठक लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे माथेरान अधीक्षक कार्यालयाने आज, १८ मार्च रोजी बैठक लावली आहे.
 
या बैठकीला माथेरान पर्यटन बचाव समिती तसेच अश्वपाल संघटनेच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच रायगड जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, तालुका तहसीलदार तसेच वन अधिकारी पोलीस अधिकारी यांची उपस्थिती बैठकीला राहणार आहे. याबाबतची माहिती महसूल विभागाचे अधिक्षक सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी श्रीराम चौक येथे येऊन आंदोलकांना दिली.

KARJT
 
पर्यटकांचे हाल
दिवसभरात माथेरान शहरात साधारण ४०० च्या आसपास पर्यटक आले असून त्यातील हॉटेलमध्ये बुकिंग असलेले पर्यटक वगळता अन्य पर्यटकांना जेवणाची कोणतीही व्यवस्था झाली नाही. त्यात नेरळ येथून माथेरान येणार्‍या मिनीट्रेनमधून साधारण १०० पर्यटक दोन प्रवासी गाड्यांमधून आले. त्या पर्यटकांना शहरातून पुन्हा माघारी परत फिरावे लागले.
 
आज सकाळी माथेरान बचाव समितीच्या आवाहनानुसार शहरातील नागरिक हे माथेरान नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात जमण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीला केवळ पाच प्रतिनिधींना बसण्याची संधी मिळणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.