मुंबई | नवी मुंबई महानगरपालिकेतील १६४ प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांना सेवेत कायम करावे याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
यावेळी उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत समावेश करण्यासंदर्भातील सिडकोच्या अहवालानुसार १६४ अर्जदारांची नावे सिडकोच्या आस्थापनेवर आढळून आलेली नाहीत, महानगरपालिकेने त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची शहानिशा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून महानगरपालिकेने या प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांची मूळ वंशावळ आणि इतर आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कर्मचार्यांच्या प्रकल्पग्रस्ततेची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्मचार्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे मंत्री सामंत यांनी सांगितले. चर्चेत विधानसभा सदस्य गणेश नाईक यांनी सहभाग घेतला.