अलिबाग आगारासमोरील वाहतूक कोंडी फुटणार? दुभाजकाची लांबी कमी करण्याचे काम सुरु

By Raigad Times    20-Mar-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग एसटी बसस्थानकासमोर होणार्‍या वाहतूक कोंडीतून आता नागरीक आणि वाहनचालकांची सुटका होणार आहे. बसस्थानकामोर असलेल्या दुभाजकाची लांबी कमी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे अलिबागकरांनी ही मागणी लावून धरली होती.
 
अलिबाग एसटी बसस्थानकासमोर असलेल्या दुभाजकामुळे आगारातून बाहेर पडणार्‍या बसेस वळवताना बसचालकांना मोठी कसरत करावी लागते. समोरच्या बाजूला जर एखादी दुचाकी उभी असेल तर वाहन पुढे सरकणेच मुश्किल होते. अनेकदा बाजारहाट करण्यासाठी आलेले किंवा हॉटेलमध्ये गेलेले नागरीक बाहेरच्या बाजूला आपली दुचाकी, चारचाकी उभी करून जातात. मग आगारातून बाहेर पडणार्‍या बसला मुंबईच्या दिशेने वाहन वळवताना अडथळा येतो.
 
एसटीबस मध्येच उभी राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होवून वाहतूक कोंडी होत असते. मागील महिन्यात बसस्थानकासमोर झालेल्या अपघातात एका तरूण दुचाकी स्वाराचा दोन दोन बसमध्ये चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर बसस्थानकासमोर होणार्‍या वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर परशुराम हिंदू सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दातार तसेच समिर ठाकूर यांनीही जिल्हाधिकारी यांना निवेदनदेखील दिले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बससथानकापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पीएनपी इमारतीसमोर अजंटा नाका इथंदेखील दुभाजकामुळे वाहतुकीला अडथळा येतो. मुरूडकडून येणारी मोठी वाहने वळवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. आणि वाहतूक कोंडी होत असते. हे लक्षात घेवून तेथील दुभाजकाची देखील लांबी करण्याचे काम सुरू झाले आहे