रायगड औद्योगिक पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनचा धडक मोर्चा

By Raigad Times    21-Mar-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | देशभरातील पंचांहात्तर लाख इ.पी.एस. पेन्शनरांच्या वतीने संपूर्ण देशपातळीवर ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ इपीएफ पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने संपूर्ण देशभर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून रायगड संघटनेतर्फे वाशी येथील विभागीय आयुक्त भविष्य निर्वाह निधी संघटन वाशी-नवी मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला होता.
 
यामध्ये कर्जत, उरण, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, पाली, अलिबाग, मुरुड, रोहा, खालापूर, महाड, माणगाव, पेण, पनवेल येथील पेन्शनर्स सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष बाळकृष्ण अंबुर्ले, उपाध्यक्ष दिलीप मेहता, सचिव श्रीराम वळणकर यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पेन्शनर्स सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध घोषणा देत सर्वजण आयुक्त कार्यालय येथे आल्यानंतर सभेत रूपांतर झाले.
 
अध्यक्ष अंबुर्ले आदी पदाधिर्‍यांनी मोर्चाच्या आयोजना बाबत संघटनेची काय भूमिका आहे यासंदर्भात विचार मांडले. यानंतर अंबुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष दिलीप मेहता, सचिव श्रीराम वळणकर कमिटी मेंबर दिगंबर म्हात्रे, विजय कदम, संघटनेचे सभासद सुरेश पंडित, नितीन जाधव, अनिल अजगरे, दिलीप गडकरी यांनी संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यासाठी तयार केलेले निवेदन आयुक्त भविष्य निर्वाह निधी संघटन वाशी यांच्याकडे सुपूर्त केले.
 
निवेदनातील सर्व मागण्यासंदर्भात केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. त्यामुळे मी हे निवेदन पंतप्रधान कार्यालयात पाठवीन. यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी दैनंदिन कामात येणार्‍या समस्यासंदर्भात चर्चा केली व त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आयुक्तांनी सहकार्‍यांना आदेश दिले.
 
यानंतर आंबुर्ले यांनी उपस्थित सदस्यांना आयुक्त यांच्या बरोबर झालेल्या चर्चेचा तपशील दिला व आपल्या संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. अध्यक्ष बाळकृष्ण आंबुर्ले यांनी मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना धन्यवाद दिले व जास्तीत जास्त सदस्यसंख्या वाढवून संघटनेला सहकार्य करण्यासाठी आवाहन केले. या मोर्च्यात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात होता. या मोर्चाने इतरांचे लक्ष वेधून घेतले.