अलिबाग | तालुक्यातील चौल-आग्राव रस्त्याचे काम लवकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी गुरुवारी (२० मार्च) चौल ग्रामस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास अभियंत्यांकडे केली आहे. तसेच आठ दिवसांत काम सुरु झाले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे अजित गुरव यांनी दिला आहे. चौल-आग्राव रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत होणार आहे.
यासाठी ४ कोटी १८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. कामाची वर्कऑर्डरदेखील निघाली आहे. मात्र याला दोन महिने उलटले तरी ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या चौल ग्रामस्थांनी गुरुवारी (२० मार्च) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास अधिकारी यांचे कार्यालय गाठत जाब विचारला आहे. चौल-आग्राव रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे.
पावसाळ्यात काम करता येणार नाही. त्यामुळे आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे अजित गुरव यांनी दिला आहे. यावेळी मारुती भगत, राजेंद्र गुरव, शैलेश घरत, निलेश गाडे, अॅड.प्रशांत वर्तक, वैभव वैद्य, प्रतीक गुरव, केदार मळेकर, पप्या म्हात्रे, नरेंद्र गाडे, रोहित पाटील, सुधीर नाईक, शितल रायकर आदी उपस्थित होते. दरम्यान, येत्या सोमवारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदार येतील, असे आश्वासन संबंधीत अधिकारी सारिका देसाई यांनी दिले आहे.