रोहा | आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने बोलावून रेशन धान्य दुकानधारकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना रोहा तालुक्यात समोर आली आहे. आईच्या फिर्यादीनुसार रोहा पोलीस ठाण्यात गुरुवारी (२० मार्च रोजी) रात्री ११ वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पीडित १७ वर्षीय मुलीला रेशन धान्य दुकानदार सुलतान दाऊद पानसरे (रा. सिद्धार्थ नगर , खालचा मोहल्ला) याने रास्त धान्य दुकान येथे आधार कार्ड लिंक करण्याच्या कारणाने बोलावून घेतले आणि तिला मोबाईलमधील अश्लील रिल्स दाखवून तिचा हात पकडला. तसेच तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन करत तिचा विनयभंग केला.
पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीला घेऊन आई सुलतान पानसरे याला जाब विचारायला गेली असता त्याने उलट दमदाटी करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी रोहा पोलिसांत सुल- तान पानसरे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१) ७९, ३५१ (२) सह पॉक्सो कायदा कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पायक हे करत आहेत.