कर्जतमधून दोन शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण

By Raigad Times    22-Mar-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अपहरण करण्यात आलेला एक विद्यार्थी बालसुधारगृहात राहून शिक्षण घेत होता आणि दुसरा विद्यार्थी कर्जत तालुक्यातील शिरसे गावात राहणारा आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्‍या या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असल्याची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
 
कर्जत दहिवली येथील बालसुधारगृहातील १२ वर्षीय विद्यार्थी आणि त्याचा मित्र अशा दोघांना १९ मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास रायगड जिल्हा परिषदेची शाळा दहीवली, निड येथे शिक्षण घेण्यासाठी म्हणून सोडण्यात आले होते. जिल्हा परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह/बालगृह कर्जत येथील बालकल्याण समिती रायगड यांच्या आदेशाने काळजी रक्षणासाठी असलेला बालक म्हणून यातील एक विद्यार्थी शिक्षण घेत होता.
 
तर त्याचा मित्र असलेला दुसरा विद्यार्थी कर्जत येथील शिरसे गाव येथे राहणारा असून त्याचे वयदेखील १२ वर्षीय आहे. हे दोन्ही अल्पवयीन विद्यार्थी १९ मार्च रोजी शाळेत गेले होते. दरम्यान शाळा सुटली त्यावेळी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी म्हणून शाळेत आले असता हे विद्यार्थी शाळेत नसल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला, मात्र ते सापडले नाहीत. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यांना फूस लावून कोणीतरी त्यांचे अपहरण केल्याचे समोर आले असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.