अलिबाग | जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषद हद्दीतील ८० हून अधिक सरकारी कार्यालयांनी घरपट्टी थकवली आहे. ही एकत्रित रक्कम ४९ लाख १३ हजार ५५१ रुपयांची आहे. यामध्ये रायगड जिल्हा परिषद कार्यालयापासून थेट अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानापर्यंत, तसेच सर्व सरकारी कार्यालये, निवासस्थान तसेच काही इतर नावाजलेल्या संस्थांचे मालमत्ता कर थकीत आहेत.
नगरपरिषदेने करवसुलीसाठी पाच वसुली पथके नियुक्त केली असून ते घरोघरी जाऊन कर वसूल करत आहेत. त्यांना रहिवाशांचे सहकार्य मिळत असले तरी सरकारी कार्यालयांकडून थकबाकी वसुली कठीण झाली आहे. यातील सर्वात मोठा थकबाकीदार रायगड जिल्हा परिषद आहे. त्यांनी २३ लाख २२ हजार ७१६ रुपये थकवले आहेत.
त्याखालोखाल नगररचना सहाय्यक संचालक कार्यालयाने ७ लाख ८३ हजार ४१२ रुपये तर पशुसंवर्धन संचालक कार्यालयाने ६ लाख ६० हजार ५६९ रुपयांचा कर थकवला आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या हक्काचे उत्पन्न असलेल्या घरपट्टी मालमत्ता कराचे उद्दिष्ट १२ कोटी रुपये असून २३ मार्च २०२५ पर्यंत ५ कोटी ८० लाख ४६ हजार ४५९ रुपये जमा झाले आहेत. म्हणजेच आतापर्यंत फक्त ४८ टक्के कर वसूल झाला आहे. त्यामुळे विविध कर विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मोठे थकबाकीदार
* मुख्य कार्यकारी अधिकारी - २३ लाख २२ हजार ७१६,
* नगररचना कार्यालय - ७ लाख ८३ हजार ४१२
* पशुसंवर्धन संचालक - ६ लाख ६० हजार ५६९
* जिल्हा रुग्णालय - २ लाख ४ हजार ६२४
* जिल्हा शल्यचिकित्सक - २ लाख १८ हजार ९९७
मुदतीत भरलेल्या करामुळे नागरी सुविधा, स्वच्छता राखणे, नगरपरिषदेची दैनंदिन कामे सोपी होतात. तसेच पालिकेला नवीन योजना राबवण्यास मदत होते. - सचिन बच्छाव, मुख्याधिकारी