पावणेदोन कोटींची फसवणूक करुन दुबईला पळालेल्या... मुरुडच्या रियाज बंदरकरला ठोकल्या बेड्या

केरळच्या कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन घेतले जाब्यात

By Raigad Times    26-Mar-2025
Total Views |
Murud
 
अलिबाग | ‘तिजाराहा इंटरप्रायझेस’ नावाने कंपनी थाटून, गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १ कोटी ७८ लाखांचा गंडा घालून दुबईला पळून गेलेल्या मुरुडमधील रियाज बंदरकरला केरळच्या कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
रियाज अहमद कासीम बंदरकर (वय ४७, रा. रा.खारीकपाडा, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, पो. नांदगांव, ता.मुरुड) याने २०१९ मध्ये मुरुडमध्ये ‘तिजाराहा इंटरप्रायझेस’ या नावाने कंपनी सुरु केली होती. या कंपनीत नागरिकांना पैसे गुंतवणूक करायला सांगून, चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष रियाजने गुंतवणूकदारांना दाखवले होते. सुरुवातीच्या दिवसांत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने नफ्याची रक्कमही गुंतवणूकदारांना दिली. मात्र नंतर, नफा बंद करत गुंतवलेली रक्कमही परत देण्यास तो टाळाटाळ करु लागला.
 
तब्बल १ कोटी ७८ लाखांची फसवणूक करुन, रियाज बंदरकर दुबईला पळून गेला होता. यासंदर्भात मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, ३ ऑगस्ट २०२४ रोजी त्याच्याविरोधात फसवणूक, पैशांचा अपहारासह एमपीआयडी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस अधीक्षक रायगड यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला होता.
 
रियाज बंदरकर दुबईला पळाल्याची माहिती मिळाल्याने, त्याच्या पासपोर्टची माहिती घेत पोलिसांकडून इमिग्रेशन डिपार्टमेंट, नवी दिल्ली येथे ‘लूक आऊट’ नोटीसवर ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सात महिन्यांनी, २४ मार्च २०२५ रोजी रियाज बंदरकर हा दुबई येथून विमानाने कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. तेथे इमिग्रेशन ऑफीसरने त्याला ताब्यात घेत पोलीस अधीक्षक रायगड यांना कळविले.
 
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे व पोलीस अंमलदार यांना कोच्ची येथे रियाज बंदरला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. तेथे पोहोचत त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी (२५ मार्च) रियाजला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
 
या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे करीत आहेत. दरम्यान, ही कामगिरी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे, पोलीस हवालदार सचिन वावेकर यांनी केली.