
पेण | पेण शहरामधील पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या आवारात असणार्या ऐतिहासिक गढीवर काही समाजकंटकांनी हिरवी चादर चढवून विटंबना केली आहे. या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पेणकर व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने पेण पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पेण शहरातील पोलीस स्टेशनच्या जागेत सदरची गढी असून, ही गढी ऐतिहासिक नोंदीनुसार तत्कालीन शूर सरदार वाघोजी तुपे यांची समाधी असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या जागेत काही अवशेष आढळून येतात त्यानुसार या गढीवर नवव्या ते बाराव्या शतकातील शिलाहार राजाच्या काळात बांधलेले मंदिराचे अवशेष असावेत, असाही अनेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे. मात्र काही समाजकंटकांनी सदर गढीवर हिरवी चादर चढवून तिची विटंबना केली आहे.
अशा समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन सर्व पेणकर व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने पेण पोलिसांना देण्यात आले. यावेळी स्वरूप घोसाळकर, मयूर वनगे, नरेश गावंड, रोशन टेमघरे, रोशन पाटील आदी उपस्थित होते.