किहीम समुद्र किनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांची अंडी

By Raigad Times    06-Mar-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील किहीम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाने अंडी घातली आहेत. दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे आवाहन कांदळवन दक्षिण कोकण विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. ऑलिव्ह रिडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनार्‍यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते.
 
वाळूच्या खाली १००- १५० या प्रमाणात अंडी देते. पुन्हा वाळूच्या साहाय्याने अंडी बुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते. अंडी वाळूच्या खड्ड्यांमध्ये स्वतःच उबतात. समुद्री कासव इतर प्राण्याप्रमाणे त्या जागी अंडी उबवण्यासाठी थांबत नाहीत, त्यासाठीच रात्री समुद्रकिनारी गस्त घालून संवर्धन करणे गरजेचे असते या कालावधीमध्ये समुद्री कासवांनी तयार केलेली घरटी शोधून घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पध्दतीने खड्डा खोदून, हाताळून समुद्र किनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये उबवण्यासाठी ठेवली अतिशय गरजेचे असते.
 
ऑलिव्ह रिडले दुर्मिळ समुद्री कासवाच्या संरक्षणासाठी चारही बाजूने जाळी लावून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी डीएफओ कांचन पवार, एसीएफ प्रियांका पाटील, आरएफओ समीर शिंदे व कर्मचारी ग्रामपंचायत सरपंच प्रसाद गायकवाड व नागरिक तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली.