पेण | पेण तालुक्यात खारभूमी खात्याचा कारभार पूर्णपणे ढासळला असून तालुक्यातील गणपती गणेशमूर्तींचे गाव म्हणून जगभरात ओळख झालेल्या जोहे खार दुतर्फा भागातील भातशेतीत समुद्राचे खारे पाणी शिरल्यामुळे शेकडो एकर भातशेती खार्या पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री आलेल्या भरतीमुळे खारे पाणी जोहे, कळवे गावाजवळील खार दुतर्फा, बोरली, डोलवीदबाबा या भागातील भात शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत झाला आहे. खारबंदीस्तीसाठी कोपर कोकेरी या स्कीमवर दहा कोटींचे टेंडर निघालेले आहे.
त्याचप्रमाणे सोनखार-उरणोली स्कीमवर पाच कोटीचा टेंडर निघालेले आहे. कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची काम प्रत्येक वेळी केली जातात; परंतु एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते. मग खारलँड विभागाचा पैसा जातोय कुठे? असा सवाल शेतकरी वर्ग करत आहे. दरम्यान, संबंधित अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.