रोहा | रोहा तालुक्यातील धामणसई येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या वणव्याने अख्खे गाव बेचिराख केले. येथील वस्तीतील ४४ घरांसह १५ गोठे व एक शाळा वणव्यात जळून खाक झाली असून, वनसंपदेचीदेखील प्रचंड हानी झाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, गोरगरीबांचे संसार उघड्यावर आले असून, धनगरवाडी ग्रामस्थांना मदतीची आस लागली आहे.
डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथील डोंगराला गुरुवारी (६ मार्च) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागला. इंदरदेव वस्तीतील घरे या वणव्याच्या विळख्यात सापडली आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. घरे जळून खाक झाली. संसाराची राखरांगोळी झाल्याने ग्रामस्थांवर मोठे संकट ओढवले. मदत बचावकार्य करण्यासाठी कोलाड येथील एसव्हीआरएसएस टीम, धाटाव येथील दीपक नायट्रेट कंपनी येथील अग्निशमन दल, वनविभाग आदी सरसावले.
डोंगरावर पाण्याचा अभाव तरी देखील सामाजिक संस्था, पंचायत हद्दीतील ग्रामस्थ युवक यांनी तत्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत शर्थीचे प्रयत्न करुन वणव्यावर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत या वणव्याने मोठे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख यांच्यासह शासकीय यंत्रणा घटनास्थळी धाव दाखल झाली. ग्रामस्थांना धीर देत, तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले.
मोलमजुरी, दुग्ध व्यवसाय करत पोट भरणारे येथील ग्रामस्थ डोंगरमाथ्यावर पुरेसे पाणी नसल्याने उन्हाळी दिवसांत उदरनिर्वाहासाठी पायथ्याशी तसेच जिथे मिळेल तिथे आपली गुरेढोरांसह आधार घेताज. तर चार पाच घरातील कुटुंब मोलमजुरीसाठी बाहेर होते. अशातच खराब रस्ता, दगडगोटे मातीचा कच्चा रस्ता, त्यातून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ प्रांत अधिकारीही काही प्रवास वाहनातून आणि काही प्रवास पायी करत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहचले.
येथील ग्रामस्थांची भेट घेत पाहणी केली. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे येथील संसार उघड्यावर पडले आहेत. उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. डोंगर दर्याखोर्यात राहत असल्याने त्यांना आपत्कालीन वनव्यावर उपाययोजना करणार्या साधन साहित्यांचे वाटप केलेले साहित्यदेखील त्यांच्याकडून माघारी घेतल्याचे समजते.
यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या परिसरात मागील चार पाच दिवस वणवे लागत असल्याचे वन खात्याच्या निदर्शनास येऊनही त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाकडून त्यांचे पुनर्वसन करण्याची, मदत मिळण्याची मागणी केली जात आहे.
भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळाव्यात यासाठी शेतकर्यांनी राब भाजणी करताना दक्षता घेणे आवश्यक आहे. यासह नागरिकांनी जंगलात फिरत असताना बेजबाबदारपणे आग लागेल, असे कोणतेही कृत्य करु नये. वणवा आटोक्यात आल्यानंतर नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्यास यंत्रणा कामास लावली आहे. - ज्ञानेश्वर खुटवड, प्रांताधिकारी, रोहा