जनतेचे सेवक असल्याचे भान ठेवून अधिकारीवर्गाने नम्रतेने वागून सेवा द्यावी , खा.सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

By Raigad Times    08-Mar-2025
Total Views |
 Murud
 
कोर्लई | आपण जनतेचे सेवक आहोत, आपली बांधिलकी जनतेशी आहे. अधिकारीवर्गाने जनतेसमोर नम्रतेपणाने वागून सेवा द्यावी, असे खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड दरबार हॉल येथे आढावा बैठकीवेळी सांगितले.
 
यावेळी प्रांतअधिकारी दुर्गा देवरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष फैरोज घलटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मनोज भगत, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित कासार, हसमुख जैन, महिला तालुका अध्यक्ष अ‍ॅड. मृणाल खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, माजी सभापती बाबू नागावकर, माजी सभापती स्मिता खेडेकर, सर्व खात्याचे अधिकारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांनी सर्व खात्याच्या अधिकार्‍यांची कानउघडणी करुन नाराजी दर्शवली. पुढे येताना प्रत्येक अधिकार्‍यांनी आपल्या खात्याचा अभ्यास करून यावा. जनतेचे जिव्हाळाचे प्रश्नताटकळत ठेवणे कितपत योग्य आहे.
 
यावेळी विद्युत मंडळाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व विविध खात्यांच्या अधिकार्‍यांना रेंगाळलेला प्रश्न तडीस नेहुन जनतेचे प्रश्न मार्गी लावावे असे आदेश देण्यात आले. निधी कमतरता भासत असेल त्याची मागणी माझ्याकडे करा. ती मी पूर्ण करीन पण जनतेचे प्रश्न सोडवा. ठेकेदरांशी हातमिळवणी करुन नका.
 
ज्या गावात पाण्याची कमतरता भासत असेल त्याठिकाणी ट्रकरने पाणी पोचवा, पाण्यापासून कोणीही वंचित राहिला नाही पाहिजे. घरकुल प्रकरण तातडीने मार्गी लावून लाभार्थ्यांना लाभ द्या, यामध्ये कोणालाही वगळू नका असा आदेश बीडीओ यांना देण्यात आले. मुरुड शहर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एशारूढ पुतळा व बाकीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्यासाठी आराखडा तयार करा, असे आदेश मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांना देण्यात आले. यावेळी आढावा बैठकीत जनतेनी मांडलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार संजय तवर यांनी सर्वांचे आभार मानून आढावा बैठक संपली असे जाहीर केले.