कर्जत | कर्जत आणि खालापूर तालुक्यातील मोठ्या विकास प्रकल्पाच्या ठिकाणी खंडणी वसूल करणारे कोण ‘आका’ आहेत? याचा शोध आम्ही घेतला असून त्यांचे सर्व कारनामे बाहेर काढले जातील आणि त्या ‘आका’ला जेलची हवा खावी लागेल, असा जाहीर इशारा सुधाकर घारे यांनी दिला. खा.सुनील तटकरे यांच्यावर टीका करणार्या लोकप्रतिनिधीचा यावेळी जाहीर निषेधही करण्यात आला. कर्जत येथे शुक्रवारी (७ मार्च) सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी परिवर्तन आघाडीचे नेते माजी सभापती अशोक भोपतराव, माजी सभापती एकनाथ धुळे तसेच अंकित साखरे, संतोष बैलमारे, दीपक श्रीखंडे, शेखर पिंगळे, रोहिदास पिंगळे, सुरेखा खेडकर आदी उपस्थित होते. सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना, सुनील तटकरे यांना आम्ही कर्जतमधील उमेदवारीबद्दल घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी केली होती.
जर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली असती तर आज कर्जतमधील आमदार कोण असता? असा सवाल करत सुनील तटकरे यांनीच आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीबाबत पूर्ण नकार दिला होता, असे घारे यांनी सांगितले. चिन्हावर लढून तुम्हाला दाखवायचे असल्याने तुम्ही रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवायला जाऊ नका, असे आवाहन सुधाकर घारे यांनी केले. बीड जिल्ह्याला लाजवेल असे ‘आका’ कर्जत तालुक्यातील जनतेला दाखविण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.
सरकारी अधिकार्यांच्या माध्यमातून तुमची सर्व कुंडली बाहेर काढली जाणार आहे. अजित पवार आणि तटकरे यांनी ठरवले असते तर कर्जतमधील आमदार मीच असतो असेदेखील घारे यांनी म्हटले आहे.इतिहासाचा वारसा जपला पाहिजे, यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ हा चित्रपट समजून घेतला पाहिजे. आपले कर्जतचे लोकप्रतिनिधींकडून अलिबाग येथे भाषण करीत असताना आपली अर्धवट माहिती देत आपली अक्कल पाजळण्याचा प्रकार आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही परिवर्तन आघाडीकडून निषेध करीत आहोत.
येथील आका कोण?
गोदरेज, लोखंडवाला, कल्पतरु या सर्व प्रकल्पामध्ये कोणाचे आशीर्वाद आहेत? हे सर्वांना माहिती आहे. यातील अनेक प्रकल्पातील सरकारी रस्ते, सरकारी निधीच्या माध्यमातून बांधलेली घरकुले तोडली जात आहेत. व्यायामशाळा तोडल्या, विहिरी बंद केल्या आहेत; या ठिकाणी आलेल्या ‘आका’चा शोध आता घ्यायचा आहे असे जाहीर केले.