नवउद्योजकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद , ११ एप्रिलला अलिबाग येथे आयोजन

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता गुंतवणूक आकर्षित करणे, विकासाला चालना देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे या उद्देशाने स्थानिक पातळीवर शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्नित विभागांच्या सहाय्याने ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२५’चे आयोजन ११ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
 
शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजल्यापासून जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय-अलिबाग येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ही जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योज , गुंतवणूकदार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या यांनी केले आहे.
 
या गुंतवणूक परिषदेस कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक व्ही.एम. शिरसाठ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी संतोष थिटे तसेच शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्नित विभागाचे अधिकारी रायगड जिल्ह्यातील औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता गतवर्षी फेब्रुवारी-मार्च २०२४ दरम्यान जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदचे आयोजन करण्यात आले होते.
 
जिल्ह्यांतील परिषदांमध्ये २ हजार ६५२ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या होऊन रु. ९६ हजार ६८० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून त्यात २ लाख ३१ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विभागस्तरीय गुंतवणूक परिषद-२०२५ चे सहा विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी मार्च-२०२५ मध्ये आयोजन करण्यात आले होते.
 
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित गुंतवणूकदार यांच्या समवेत उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन सोबत सामंजस्य करार होणार आहे. तसेच गुंतवणूक विषयक धोरणाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशान्वये जिल्हास्तरावरस्थानिक पातळीवर शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्नित विभागांच्या सहाय्याने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयेाजन करण्यात येत आहे.