रायगडावर ड्रोन, हवाई उपकरणांवर बंदी , गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शनिवारी, १२ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यामुळे किल्ले रायगड परिसरात ड्रोनसह हवाई उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. दौर्‍यात रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड व सुतारवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री शहा भेट देणार आहेत.
 
या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षा कारणास्तव सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत २ कि.मी. परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅडग्लायडर्स इत्यादींच्या वापरावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी कळविले आहे.
अभिवादन कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १२ एप्रिल रोजी रायगड किल्ल्यावर सकाळी ११ वाजता राजदरबारात श्री शिवप्रतिमा पूजन, सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान, गडरोहण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
 
श्री शिवपुष्पस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निलकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सैन्यदल अधिकारी ले.जन. संजय कुलकर्णी यांचा सन्मान व सरदार घराणे सन्मान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंगजी होळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.