आजारातून सुटकेसाठी आजीचा टोकाचा मार्ग? रोह्यात नातवासह आजीची आत्महत्या

इमारतीच्या गच्चीवरुन उडी; दोघांचाही मृत्यू

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
roha
 
रोहा | रोह्यातील एका महिलेने तिच्या दोन वर्षांच्या नातवासह इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर रोह्यात शोककळा पसरली आहे. आजी आणि नातू दोघेही आजारग्रस्त होते. त्यातून सुटकेसाठी आजीने हा चुकीचा मार्ग निवडला, असा अंदाज व्यक्त होत आहे.
 
या घटनेनंतर रोहा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रोहे शहरातील दमखाडीजवळील गजबजलेल्या परिसरात ओम चेम्बर्स बिल्डिंग या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर सिद्दीराम कोरे हे कुटुंबियांसमवेत राहत असून ते धाटाव एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांची पत्नी उर्मिला कोरे यांना मागील चार वर्षांपासून मनासिक आजार जडला होता. त्यावर औषधोपचार चालू होते.
 
परंतु औषधे वेळेवर न घेतल्याने तिचा आजार बळावला होता. दुसरीकडे नातू वेदांत विवेक भोगडे यालादेखील ट्यूमर असल्याचे डिटेक्ट झाले होते. त्यामुळे बुधवारी त्याला उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते. मात्र त्यापूर्वी सकाळीच साडेसात वाजण्याच्या सुमारास आजी उर्मिला कोरे या वेदांत याला इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर घेऊन गेली आणि खाली उडी मारली.
 
या घटनेत उंचावरुन पडल्याने अति रक्तस्राव होऊन आजीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी वेदांतला तातडीने पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर रोहा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अधिकचा तपास रोहा पोलीस करीत आहेत.