कोर्लई | उन्हाच्या तीव्र झळांनी मुरुडकर अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत तर अतिउष्णतेमुळे अक्षरशः अंगाची लाही लाही होते. परिणामी, पर्यटकांची संख्या रोडावली आहे. दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्यामुळे, रस्ते, बाजारपेठा ओस पडतात.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शयता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याच महिन्यात मागील आठवड्यात उष्णतेची लाट आली होती.
त्यावेळी मुरुडमध्ये तापमानात चढ उतार दिसून येत होता. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुरुडमधील तापमान काही अंशाने कमी झालेले पहावयास मिळाले मात्र पुन्हा वातावरण स्वच्छ होऊन कडक सूर्यप्रकाश पडून वातावरण तापायला सुरुवात झाली. दुपारपर्यंत मुरुड चांगलेच तापले होते. त्यामुळे मुरुडच्या नागरिकांनी व पर्यटकांनी देखील घरातच बसून राहणे पसंत केले.