वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग!

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | कल्याण आणि भांडुप परिमंडलात वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल- दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. या कामांमुळे पावसाळापूर्व वादळवारा व मान्सुनच्या सुरुवातीला खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याची तीव्रता कमी होण्यास मदत मिळेल.
 
संबंधित भागातील वीज ग्राहकांना पूर्वकल्पना देणारे मेसेज त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून त्या-त्या भागात देखभाल- दुरुस्तीची कामे करण्यात येत असून या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये वीज वितरण रोहित्र (डीपी), उपकेंद्र तसेच उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची कामे तसेच वीज वितरण यंत्रणेत अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते.
 
सर्वेक्षणानंतर आवश्यक कामांची निवड करून स्वंयचलित एनडीएम प्रणालीत संबंधित काम व भागांची माहिती भरण्यात येते. त्यानुसार संबंधित भागातील वीज ग्राहकांना प्रणालीमार्फत वीज बंद ठेवण्यात येणार्‍या कालावधीबाबत पूर्वकल्पना देणारे मेसेज त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवले जातात. त्यामुळे सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.