कर्जत | कर्जतमध्ये आमदार थोरवे यांना जोरदार टक्कर देणार्या सुधाकर घारे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे चांगलेच खूश आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मेळाव्यात त्यांनी ‘पुन्हा येईन तोपर्यंत घारे यांचे पुनर्वसन झालेले असेल’, अशी घोषणाच केली आहे. त्यामुळे घारे यांना विधानपरिषद की महामंडळाची बक्षिसी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
बुधवारी (९ एप्रिल) कर्जत येथील सीबीसी लॉन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. गेली ३५ वर्षे मी कर्जतमध्ये दर पंधरा दिवसांनी येत होतो. मात्र आता मी अनेक महिन्यांनी आलो. त्याला मध्यंतरी घडलेले राजकारण कारणीभूत होते. नम्रपणे जमिनीवर असणारा माणूस कधीही राजकारणात किंवा समाजकारणात मागे पडणार नाही. हे गुण सुधाकर घारे यांच्यामध्ये आहेत. अपक्ष उमेदवाराला ९० हजारापर्यंत मते मिळणे ही साधी गोष्ट नाही.
पराभूत होऊनही त्यांनी आपला एकही कार्यकर्ता इकडे तिकडे जाऊ दिला नाही. यातच सारे काही आले. त्यामुळे आगामी काळात कर्जतमध्ये पुन्हा येईन त्यावेळी सुधाकर घारे यांचे पुनर्वसन झालेले असेल आणि त्या आनंदात सहभागी व्हायला येईन, असे जाहीर आश्वासन तटकरे यांनी दिले. मीसुद्धा पहिल्या निवडणुकीत पराभूत झालो होतो; पण जिद्द सोडली नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करत राहिलो म्हणून मी आज येथे आहे.
श्रीवर्धन मतदारसंघात जितका निधी मिळतो, त्यापेक्षा काकणभर जास्त निधी या मतदारसंघात मिळेल. येथील नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असून आदिवासींसाठी सांस्कृतिक भवन पुढील वर्षांच्या ९ एप्रिलपर्यंत उभारले जाईल. असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथे दिले. कर्जत येथील कार्यालय हे राज्यातील सर्वात मोठे कार्यालय असून अजित पवार हे जाहीरपणे सांगतात. याच कार्यालयातून जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावे, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी, आपले हे दुसरे पर्व असून निवडणुकीत सुनील तटकरे यांची गाडी कर्जत खालापूरमध्ये फिरली असती आणि खोपोलीमध्ये मसुरकर यांच्या घरापर्यंत पोहचली असती तर कर्जत विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आमदार झाले असते, असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात एका अपक्षाला ९० हजार मते मिळाली असून मुंबई उच्च न्यायालयात माझे पिटीशन दाखल आहे.
पराभव झाला तरी दुसर्या दिवशी कार्यालयात आलो आणि पूर्वीसारखे काम सुरू केले आहे. सुनील तटकरे यांना विरोध करणारी माणसे राजकारणातून हद्दपार झाली असून कर्जत येथे देखील आगामी काळात हे पहायला मिळेल, असा टोला विद्यमान आमदार यांना लगावला. कर्जत तालुक्यातील आदिवासी भवन आगामी काळात राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, भगवान भोईर, दत्ता मसूरकर, उमा मुंढे, संतोष बैलमारे, दीपक श्रीखंडे, अजय सावंत, ऍड. रंजना धुळे, नारायण डामसे, जयवंती हिंदोळा, मधुकर घारे, गजानन देशमुख, रवींद्र झांजे, सचिन करणूक, जयेंद्र देशमुख, अरुण मालुसरे आदींसह माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.