पेण | घराच्या असेसमेंट उतार्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक परमेश्वर जाधव याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वकिलाच्या तक्रारीनंतर शुक्रवारी (११ एप्रिल) सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे वकील असून त्यांच्या पक्षकाराला न्यायालयीन कामकाजासाठी तसेच एमएसईबी येथे सादर करण्यासाठी त्यांच्या पेण वडगाव येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक होता. त्यासाठी त्यांनी मळेघर येथील ग्रामसेवकाकडे १७ मार्च रोजी रितसर अर्ज केला होता.
परंतु, सदर पक्षकार वयोवृद्ध असल्याने, त्यांनी असेसमेंट प्राप्त करण्यासाठी वकिलाच्या नावे १० एप्रिल रोजी कुलमुखत्यारपत्र तयार करुन दिले होते.१० एप्रिल रोजी तक्रारदार वकिलाने मळेघरचे ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव (वय ४८ वर्षे) यांना फोनवरुन संपर्क साधून, कामाबाबत विचारणा केली असता त्याने या कामासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात सदर वकीलाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
शुक्रवारी (११ एप्रिल) या तक्रारीची पडताळणी केली असता, ग्रामसेवक परमेश्वर जाधव याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लागलीच सापळा रचून परमेश्वर जाधव याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. नवी मुंबई अॅन्टी करप्शनच्या पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, महिला पोलीस नाईक बासरे, शपाई चौलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.