गृहमंत्री अमित शहा आज किल्ले रायगडवर , तटकरेंच्या घरी शाहीभोजन!

शिवसेना आमदार अस्वस्थ, तटकरेंच्या निमंत्रणाकडे फिरवणार पाठ

By Raigad Times    12-Apr-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | देशाचे गृहमंत्री अमित शहा आज (१२ एप्रिल) किल्ले रायगडावर येत आहेत. किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे नेते, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तेथे त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी तटकरेंच्या घरीदेखील जोरदार तयारी करण्यात आली आहे.
 
दुसरीकडे शिवसेना आमदारांना ही बाब फारशी रुचलेली नसल्याचे दिसत असून ते या भोजनाकडे पाठ करण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्रीपदावरुन जोरदार वाद आहे. आमदारांच्या विरोधामुळे तटकरेंची लेक, मंत्री अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे खासदार तटकरेदेखील हट्टाला पेटले आहेत.
 
या पार्श्वभूमीवर आज (१२ एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड किल्ल्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह महाराष्ट्र दौर्‍यावर असणार आहेत. त्यानिमित्त अमित शाह खासदार सुनील तटकरे यांच्या ‘गीता बाग’ या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. खरे तर, गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा यांच्या भोजनाची व्यवस्था भाजपच्या नेत्यांकडे केली जाईल, अथवा रायगडजवळच महाड येथे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली जाईल, अशी चर्चा होती.
 
मात्र अमित शहा हे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचे समजल्यानंतर शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहा यांनी तटकरेंकडे भोजन करु नये, असे त्यांना वाटत होते; मात्र बोलण्याची हिम्मत कोणीही दाखवली नाही. सुनील तटकरे यांच्याकडून शिवसेना आमदारांना भोजनाचे निमंत्रण पाठवल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे, मात्र सेनेचे आमदार तिकडे पाठ फिरवणार असल्याचे समजते.
 
महाडमध्ये भरत गोगावले व्यस्त आहेत तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. वास्तविक तटकरेंच्या घरी न जाण्यामागे पालकमंत्री पदावरुन सुरु असलेल्या वादाची झालर आहे. भाजप नेते अमित शहा यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते यावेळी असणार आहेत, त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवावा, अशी अपेक्षा आ. दळवी यांनी व्यक्त केली आहे.
 
गृहमंत्री अमित शहा, सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार असल्याने शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांना फारसे रुचलेले नाही, काहींनी नाराजी बोलून दाखवली. यावर भाजपचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, "या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. अमितभाई शहा यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे. हे आमचे संस्कार आहेत. अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असतील तर गोगावले, एकनाथ शिंदे यांनी नाराज होण्याचे कारण नाही.” "सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिले आहे. एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिले आहे, गोगावलेंना निमंत्रण दिले आहे. मलाही निमंत्रण दिले आहे. या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये”, असेही बावनकुळे म्हणाले.