माणगाव बस आगाराला एकही नवीन बस नाही , १४ वर्षानंतरही जुन्याच बस गाड्यांबरोबर आगराचा संसार चालू

By Raigad Times    12-Apr-2025
Total Views |
 mangoan
 
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव हे तालुयाचे महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दररोज शेकडो प्रवासी एस.टी. बसचा वापर करतात. मात्र माणगाव एस.टी. आगारात आजही जुन्या, गंजलेल्या आणि वारंवार बिघडणार्‍या बसगाड्याच धावत आहेत. बसमधील वारंवार होणार्‍या बिघाडीच्या घटना घडत असल्याने याचा प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.
 
या उलट, माणगावपासून ३० किमी अंतरावर असलेल्या महाड आगाराला नुकत्याच काही नव्या बसगाड्या देण्यात आल्या आहेत. मात्र माणगाव आगाराच्या पदरी नवीन बस गाड्या अभावी निराशाच आली आहे. महाड-पोलादपूर-माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याच शिवसेना पक्षाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे निकटवर्तीय आहेत.
 
माणगाव बस आगाराला एकही नवीन बस दिली नसल्याने परिवहन मंत्र्यांनी दुजाभाव केला असल्याची चर्चा माणगाव तालुयातील नागरिक व प्रवासी वर्गातून बोलताना व्यक्त होत आहे. माणगाव तालुका हा मुंबई -गोवा महामार्ग व मुंबई- गोवा साऊथला जोडणार्‍या लोहमार्गावर तसेच औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने विकसित होत असलेल्या दिघी पोर्ट बंदर ते माणगाव पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे.
 
माणगाव बस आगारातून हजारो प्रवासी नागरिक परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज प्रवास करीत असतात हे बस आगार १४ एप्रिल २०११ मध्ये स्थापन झाली. त्याला १४ वर्ष लोटली. तेव्हापासून आजतागायत जुन्याच गाड्या या बस आगाराला देण्यात आल्या आहेत. त्या सतत नादुरुस्त होत असल्याने प्रवासी वर्गही शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहे. अनेक वेळा गाड्यांचे ब्रेक डाऊन तर तांत्रिक बिघाड होत असल्याने गाड्या वेळेवर सुटत नाहीत.
 
तसेच प्रवाशांना ने-आण करण्यासाठी गेलेल्या बस गाड्या वेळेवर परत येतील याचा भरोसा कोणालाच देता येत नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्याबरोबर तेथे मोठ्या प्रमाणात नवीन बस गाड्या उपलब्ध करून दिल्या. तर त्यांच्याच पक्षाचे निकटवर्तीय असणारे आमदार तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची जन्मभूमी असणार्‍या महाड आगाराला नुकत्याच नवीन बस गाड्या देण्यात आल्या आहेत.
 
मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असणार्‍या माणगाव आगाराकडे दुर्लक्ष का? असा सवाल आता स्थानिकांमध्ये उमटू लागला आहे. माणगाव आगाराचे कामकाज नियमित सुरू असतानाही, नव्या बसगाड्यांची टंचाई अजूनही कायम आहे. अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंत्या करूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. परिसरातील विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ही एक मोठी समस्या बनली आहे.
 
प्रशासनाने व भरत गोगावले तसेच परिवहन खात्याने माणगाव आगारासाठीही तातडीने नव्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, कशी मागणी प्रवासी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. अन्यथा ‘उपेक्षा हीच नियती’ असे माणगाव आगाराच्या नशिबी कायमचे कोरले जाईल. माणगाव बस आगार हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे.
 
स्थानिक तसेच लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी पुरेशा बसगाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा अवलंब करावा लागतो. परिणामी, एसटी महामंडळाचे उत्पन्न घटत आहे, अपुर्‍या बसगाड्यांमुळे अडचणी वाढत आहेत. सध्या माणगाव आगारात ३१ बसगाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी १५ सीएनजी व १६ डीझेलवर चालणार्‍या आहेत तर ६ खासगी भाडेतत्वावर घेतल्या असून त्या लांब पल्ल्यांच्या प्रवाशांसाठी वापरल्या जात आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि कोकणातील विविध भागांना जाणार्‍या-येणार्‍या गाड्या वेळेवर उपलब्ध नसल्याने अनेकजण खासगी वाहनांकडे वळत आहेत.