सुधागड-पाली | अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित झाले आहे. त्याबरोबरच येथील अनेक वाहिन्या आतून गंजल्या आहेत त्यामुळे काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ व काळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. येथील खडकआळी येथील नळांना मागील महिनाभरापासून काळेकुट्ट पाणी येत आहे.
नळाला पाणी आल्यावर सुरुवातीचे काही काळ काळे पाणी येते आणि त्यानंतर मग थोडे स्वच्छ पाणी येते. याचबरोबर काही दिवसांपूर्वी बल्लाळेेशरनगर, प्रबुद्धनगर आदी ठिकाणी देखील गढूळ, काळे व हिरवे पाणी येत होते. अशुद्ध व काळ्या पाण्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. यावर उपाययोजना म्हणून नगरपंचायततर्फे उन्हेरे धरणातील पाणी अंबा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे अंबा नदीचे पाणी काही प्रमाणात शुद्ध झाले आहे.
मात्र तरीही सुरुवातीला नळांना होणारा पाणीपुरवठा हा गढूळ पाण्याचा होतो. कारण नळांमध्ये पाणी घाण, शेवाळ जाऊन साठते आणि ती नळाद्वारे बाहेर येते. अंबा नदीला प्रदूषणाचा विळखा अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोयात आली आहे.
कंपन्यातील दूषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखील पाणी खराब होते.
खडकाळी येथे नळाला येणारे काळे पाणी हे तेथील गटाराचे काम सुरू असल्यामुळे येत होते. मात्र आता तेथील दुरुस्ती केली आहे. शिवाय उन्हेरे धरणाचे पाणी अंबा नदीला सोडल्यामुळे शहरात इतर ठिकाणी देखील पाणी स्वच्छ येत आहे. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. -प्रतीक्षा पालांडे, पाणीपुरवठा, आरोग्य सभापती पाली नगरपंचायत
नळाला अतिशय दूषित, दुर्गंधीयुक्त व काळेकुट्ट पाणी येत आहे. पूर्ण शहरातच दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे अशी अनेक नागरिकांची तक्रार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. -महेश बारमुख, शिक्षक नागरिक, पाली