एसटी कर्मचार्‍यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

By Raigad Times    12-Apr-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | एसटी कर्मचार्‍यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असे नि:संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचार्‍यांना दिले आहे. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते.
 
यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते. ते पुढे म्हणाले की, आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणार्‍या ८३ हजार कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६% देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
 
यापुढे महिनाभर कष्ट करणार्‍या एसटी कर्मचार्‍याचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बॅक खात्यांत जमा करण्यात येईल! त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकार्‍यांना भेटून विनंती करेन! परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचार्‍यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, असे नि:संदिग्ध आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचार्‍यांना दिले. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ आहे असेही ते म्हणाले.