दगड वाहतूक करणार्‍या डंपरचालकाकडून वीज खांबांना अनेक वेळा धडकण्याचे प्रकार

By Raigad Times    14-Apr-2025
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील जीवना बंदर या ठिकाणी जेट्टीचे मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन दांडा या ठिकाणीदेखील जेट्टीचे काम सुरू आहे. या जेट्टीच्या कामासाठी दहा टायरच्या डंपरमधून खूप मोठ्या प्रमाणात दगडांची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र डंपर चालकांच्या बेपर्वाईमुळे अनेक वेळा महावितरणच्या विजेच्या खांबांना धडक मारण्यात येऊन, श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तासंतास खंडित होत आहे.
 
एका पोलला जोरदार धडक बसल्यानंतर सोबत दोन ते तीन पोलचे नुकसान होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या सर्व वीज वाहकतारा तुटून जातात. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणच्या कर्मचार्‍यांना जवळजवळ सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. सध्या सुट्ट्यांचा मोसम सुरू झाला आहे. आज देखील शनिवार असल्याकारणाने श्रीवर्धन शहरातील हॉटेल व रिसॉर्ट्स पूर्णपणे फुल आहेत.
 
अशावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पंधरा दिवसापूर्वी श्रीवर्धन येथील आंबेडकर चौकामधील एका वीज खांबाला एका डंपरने धडक मारल्यानंतर जवळजवळ साडेसात तास वीज पुरवठा खंडित झाला होता. दांडा जेटीसाठी दगड वाहतूक समुद्र किनार्‍याच्या बाजूने करण्यात येते. या ठिकाणाहूनच डंपरची लाईन जात असताना मोरया बीच हाऊस समोर असलेल्या वीजेच्या खांबाला डंपर ने डंपर मागे घेताना जोरदार धडक मारल्याने त्या ठिकाणचे दोन पोल तुटल्याचे दिसून येत आहे.
 
त्याचप्रमाणे विजांच्या तारा देखील तुटलेल्या असून त्या रस्त्यावरती ललोंबकळत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार दुपारी बारा वाजता घडला होता परंतु वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कंत्राटी ठेकेदार दुपारी तीन नंतर त्या ठिकाणी काम करण्यासाठी हजर झालेले आहेत. तरी दगडाची वाहतूक करणार्‍या डंपर मालकांनी व सदर जेट्टीचे काम करणार्‍या कंपनीने डंपर चालकांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी श्रीवर्धन मधील स्थानिक नागरिकांकडून व पर्यटनाशी निगडीत व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.