रायगडात २३११ कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार , जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत २५० हून अधिक उद्योजकांचा सहभाग

२ हजार ८६५ रोजगार निर्मिती होणार

By Raigad Times    14-Apr-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२५ कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात एकूण २ हजार ३११ कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले असून यातून एकूण २ हजार ८६५ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. रायगड जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकां सोबत दरमहा जिल्हा उद्येाग मित्र समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केले.
 
महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या परिषदेकरित उद्योग सह संचालक, कोकण विभाग श्रीमती विजू शिरसाठ, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती.
 
मोरे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जी. एस. हरळय्या, स्टेट बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक विलास शिंदे तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षासह सुमारे २५० पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व सामंजस्य करार धारकांना पुढील गुंतवणूक कालावधीत शासकीय सर्व कामे प्राधान्याने करण्यात येवून पुढील कालावधीत जास्तीत जास्त रायगड जिल्ह्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल असे सांगितले.
 
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात रायगड -जिल्ह्याने प्रथमच १००% उद्दीष्टपूर्ण केल्याने जिल्हा उद्योग केंद्र व सर्व बँकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील आस्तित्वातील सर्व उद्योजकांचे १०० दिवशीय कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अनुषंगाने समस्या विषयी चर्चा करण्यात आली. उद्योग सह संचालक, कोकण विभाग,श्रीमती विजू शिरसाठ यांनी जिल्हा गुंतवणूक परिषदेचे उद्देश व एंकदरीत कोकण विभागातील औद्योगिक विकास व विस्तार याबाबत नमूद करुन मुख्यमंत्री रोजागार निर्मिती कार्यक्रम सारख्या - शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने १००% पेक्षा जास्त उद्दीष्ट यावर्षी साध्य केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले.
 
उद्योग विभागाने मैत्री २.० सारखे अत्याधुनिक पोर्टल मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सुरु केल्याने नविन गुंतवणूकदारांना एक खिडकी सुविधा प्राप्त झालेले आहे. सामंजस्य करारातील काही उद्योजकांना जिल्हाधिकारी, रायगड यांच्या हस्ते सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत १००% उद्दीष्ट्र पूर्ण केलेल्या बँकाचे प्रशस्ती पत्रक देवून यावेळी गौरविण्यात आले.
 
जिल्हा गुंतवणूक परिषदेस एमआयडीसी, नगर रचना विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, मैत्री, इंडियन पोस्ट या विभागाचे सादरीकरण करण्यात आले. सदर जिल्हा स्तरीय गुंतवणूक परिषदेकरिता रायगड जिल्ह्यातील एकूण २२५ पेक्षा अधिक उद्योजकासह जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनाचा सहभाग होता. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड, जी. एस. हरळय्या यांनी जिल्ह्यातील उद्येागांच्या विकासा करिता जिल्हाधिकारी यांच्या सुक्ष्म नियोजन व सक्रिय सहभाग असल्याने उद्योगाचा विकास प्राधान्याने होत असल्याचे नमूद करुन विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाने आजची गुंतवणूक परिषदेचे आयोजन केल्याचे नमूद केले.