पनवेल | काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी (वय ३५) याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी याला तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याने रविवारी (१३ एप्रिल) पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
सध्या तळोजा कारागृहात असलेल्या विशाल गवळी याने टोकाचे पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचे समोर आले आहे. गवळी याने तळोजा कारागृहातील बाथरूममध्ये गळफास लावून जीवन संपवले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या विशाल गवळी याने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याने या मुलीचा मृतदेह सुमारे १३ किलोमीटर दूर अंतरावर नेऊन टाकला होता. तसेच तो शेगाव येथे जाऊन लपला होता.