आस्वाद पाटील यांचा उद्या भाजप प्रवेश , कोण कोण पक्ष सोडणार? याकडे शेकापचे लक्ष

By Raigad Times    15-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे अ‍ॅड. आस्वाद पाटील उद्या १६ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या सहकार्‍यांसमवेत मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अलिबाग विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरुन पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली होती.
 
जिल्हा चिटणीसपदावर कार्यरत असलेल्या आस्वाद पाटील यांना डावलत पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आस्वाद पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील हे निवडणुकीत अलिप्त राहिले होते. शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला. यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर आस्वाद पाटील यांनी जिल्हा चिटणीसपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते भाजपच्या संपर्कात होते.
 
मात्र पक्षप्रवेश होत नव्हता. त्यामुळे आस्वाद पाटील यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. आता आस्वाद पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या १६ एप्रिल रोजी मुंबईत ते आपल्या निवडक सहकार्‍यांसह पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती भाजपच्या पदाधिकार्‍यांनी दिली. आस्वाद पाटील यांच्या हातात काही काळ शेकापक्षाची सूत्रे राहिलेली आहेत.
 
त्यामुळे ते आपल्यासोबत कोण कोण पदाधिकारी, कार्यकर्ते नेतात? पक्षाची किती हानी करतात? याकडे शेकापचे लक्ष असणार आहे. दरम्यान, अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील हे देखील सध्या नाराज आहेत. शेकाप हा कोणाच्या बापाचा पक्ष नाही, असे त्यांनी यापूर्वी अनेकदा ठणकावले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील शेकापच्या पदाधिकार्‍यांचे लक्ष असणार आहे.