उपजिल्हाप्रमुख सचिन कर्णूक यांनी मनसेला ठोकला रामराम

मनसेला कर्जत खालापूरात खिंडार

By Raigad Times    15-Apr-2025
Total Views |
KHOPOLI
 
खोपोली | कर्जत खालापूर विभागात मनसेला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. उपजिल्हाप्रमुख सचिन कर्णूक यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपजिल्हाप्रमुख सचिन कर्णूक यांनी मनसे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात काम केले असताना त्यांनी मनसे पक्षाला का रामराम ठोकला? याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
 
आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली तरी या मोर्चेबांधणीत मनसे पक्ष मागे पडला असून मोर्चे बांधणी होण्यापेक्षा मनसेला गळती लागल्याने अनेक जण जय महाराष्ट्र करत आहेत. तर उपजिल्हाध्यक्ष सचिन कर्णूक हे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जात असताना कर्णूक यांनी का जितेंद्र पाटील यांची साथ सोडली?
 
याबाबत अनेक चर्चांना उधाण आले असून जितेंद्र पाटील यांनी पक्षाची गळती होत असताना कोणतीही पक्ष वाढीसाठी भूमिका घेत नसल्याने पक्षात याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणूक, बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी विविध निवडणूकीतही मनसे आपले उमेदवार उभे करित नसल्याने मनसे पक्षाच्या राजकीय वाटचालीवर शंका उपस्थित केली जात असताना जिल्हा नेतृत्वाच्या मनमानी कारभाराचा फटका मनसे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीला बसू शकते, असे मत मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
 
विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी जे.पी.पाटील यांना एबी फॉर्म दिला होता, परंतु एबी फॉर्म मिळूनही मनसेने उमेदवारी न भरल्याने मनसेतील आलबेल विधानसभा मतदारसंघात समोर होते. तर त्यामुळे एबी फॉर्म मिळूनही मनसेने का उमेदवारी भरली नाही? याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले गेले.