खा.तटकरे, ना.गोगावले यांच्यात दिलजमाई? तोंड बघणे टाळत होते, पहिल्यांदाच आले एका व्यासपीठावर!

By Raigad Times    15-Apr-2025
Total Views |
 tala
 
तळे | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागले आहे. आ. थोरवे, आ. दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हेदेखील तटकरेंसोबत एकत्र पहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
 
माणगाव येथील गवळी समाजबांधवांच्या यादव सहाय्यक समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सोमवारी (१४ एप्रिल) मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या दोघांमध्ये सुरु असलेला वाद पाहता या कार्यक्रमाला ते एकत्र येतील का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र ते दोघे आले, भाषणे केली. हलके चिमटेदेखील खा. तटकरेंनी काढले.
 
खा. तटकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच भगवद्गीतेतील एका उपदेशातील ओळींनी केली. "भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, तुझे कर्तव्य पूर्ण निष्ठा आणि प्रयत्नाने करत जा आणि फळाची अपेक्षा करू नको, कर्म करत जा. अर्जुनाचा हा उपदेश आजच्या जीवनातही खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला आपल्या कामांमध्ये निष्ठा आणि समर्पण ठेवून, फळाची अपेक्षा न करता काम करत राहणे आवश्यक आहे” असे त्यांनी यावेळी सांगितले. आज भरतशेठ आणि मला ६ महिन्यांच्या कालावधीनंतर एका व्यासपीठावर आणण्याचे काम गवळी समाजाने केले आहे.
 
मी या कार्यक्रमासाठी सात तारीख दिली होती; पण भरतशेठ यांनी १४ तारीख दिली, त्यांच्या सोयीनुसार मी काही काही गोष्टी घेत असतो, हेदेखील त्यांनी समजून घ्यावे, अशी कोपरखळी खा. तटकरे यांनी यावेळी मारली. याठिकाणी सर्वजण भरतशेठ यांना ‘गरिबांचा कैवारी’ म्हणून उल्लेख भाषणात करत आहेत. मग गेली अनेक वर्षे मी काय करत आहे? असा मिश्कील सवाल त्यांनी केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ना. भरत गोगावले यांनी, ‘मानवता हाच खरा धर्म आहे.
 
धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण आहे. तळा माणगाव तालुक्यातील गवळी समाजबांधवांना आमचा तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ माझ्याकडे घेऊन आला, मी क्षणाचाही विचार न करता १ कोटी माझ्या गवळी बांधवांसाठी घोषित केले. त्यातील ४० लाख सुपूर्द केले. आज भूमिपूजनाच्या निमित्ताने उर्वरित ६० लाख रुपये देण्याचे आश्वासन देतो’ असे त्यांनी म्हटले.
 
शेवटी तुमचा सहभाग आणि पाठिंबा यामुळेच आम्हाला काम करायची ताकद मिळते. तुम्ही निवडून दिल्यामुळेच आम्ही आमदार, खासदार आणि मंत्री झालो. या इमारतीसाठी शासकीय निधी मी दिलाच आहे; पण या इमारतीला लागणारे फर्निचरदेखील स्वखर्चाने मी देणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
या कार्यक्रमासाठी माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, यादव सहाय्यक समिती अध्यक्ष तुकाराम खेडेकर, बांधकाम समिती अध्यक्ष प्रद्युम्न ठसाळ, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, राष्ट्रवादी माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, महिला तालुका अध्यक्ष संगीता बक्कम, मोर्बा ग्रामपंचायत सरपंच शौकत रोहेकर, उपसरपंच राजू मोरे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, उपस्थित होते.
वाद शमतोय...चर्चा सुरु
रायगडात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. लोकसभेला मनापासून मदत केली; पण तटकरेंनी विधानसभेला आम्हाला फसवले असल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी होता. तसेच पालकमंत्रीपदावरुनही या दोघांत वाद आहे.
 
त्यामुळे तटकरेंवर तोंडसुख घेण्याची एकही संधी शिवसेना आमदार सोडत नाहीत. मंत्री भरत गोगावले आणि खा. तटकरे सहा महिन्यांत एकदाही व्यासपीठावर आले नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सेनेचे तीनही आमदार विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील वाद हळूहळू शमताना दिसत आहे.