अलिबाग | छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर अभिवादन केले. राजसदरेवर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, रोहयो मंत्री भरत गोगावले, खा. उदयनराजे भोसले, खा. धैर्यशिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, रवि पाटील, महेश बालदी, प्रवीण दरेकर, विक्रम पाटील, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी आंग्रे, आदी उपस्थित होते. दरवर्षी स्मारक मंडळाच्या वतीने स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होत असताना योगदान देणार्या सरदार घराण्याचा सन्मान करण्यात येतो.
यंदा होळकर घराण्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदयसिंह होळकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सैन्यदल अधिकारी ले.जन. संजय कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या हस्ते श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निलकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच अशोक बांगर लिखित ‘शिवरायमुद्रा’ स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.