रोहा शिवसेना तालुकाध्यक्ष समीर शेडगे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

शेडगे यांच्या प्रवेशाने पक्षाला नवी ऊर्जा - खा. सुनील तटकरे

By Raigad Times    15-Apr-2025
Total Views |
roha
 
रोहा | रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे भूतपूर्व तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी त्यांच्या शेकडो समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने रोहेकरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती.
 
शहरातील ऐतिहासिक राममारुती चौक येथे १३ एप्रिल रोजी आयोजित जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना खा. सुनिल तटकरे यांनी या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला नवीन ऊर्जा मिळणार असून आपण सर्वदूर बांधिलकी घेऊन रोह्याच्या विकासासाठी एकत्रपणे काम करू असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर मंत्री. अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, सरचिटणीस सुरेश मगर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. खा. सुनिल तटकरे यांनी समीर शेडगे कामाचा, कष्टाचा आणि मेहनत घेणारा हाडाचा कार्यकर्ता आहे.
 
त्याचे मी जाहीरपणे कौतुक करतो. त्यांचे आणि आमच्या घराण्याचे तीन पिढ्यांचे नाते आहे. आमचे राजकीय मतभेद होते. परंतु मनभेद नव्हते. मात्र समीर शेडगे यांच्या प्रवेशाने राजकीय मतभेद देखील दूर झाले असून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पूर्णपणे शहराच्या विकासासाठी काम करायला मिळेल. अदिती, अनिकेत आणि समीर यापुढे रोहा तालुका व जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील. यापुढे सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी तीन बत्ती नाका ते राम मारुती चौकपर्यंत खा. सुनील तटकरे व समीर शेडगे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांची वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यकर्त्यांनीही केला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या समवेत उपतालुका प्रमुख महादेव साळवी, तालुका महिला संघटक नीताताई हजारे, शहर महिला संघटक समीक्षा बामणे, अनिकेत साळवी, आदित्य कोंडाळकर, अमित कासट, इरफान दर्जी, बिलाल मोरबेकर, मुजम्मील येरुणकर, समीर दाखवे, हर्षद साळवी, गणेश हजारे, मजहर सिद्दीक, जव्वाद कुवारे आदी प्रमुख मंडळीसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.