पनवेल, कळंबोली येथील तरुणाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

By Raigad Times    16-Apr-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | कळंबोलीत राहणार्‍या इंजिनिअरींगच्या तिसर्‍या वर्षात असलेल्या तरुणाने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आहे. मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कुणाल पोपट जाधव (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
 
तो कळंबोलीमधील हंसध्वनी गृहसंकुल सोसायटीत कुटुंबासह राहत होता. कुणालचे वडील मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कुणाल नेरुळमधील तेरणा इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत होता. मागील काही दिवसांपासून कुणालला मायग्रेनचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या मनात सतत आत्महत्या करण्याचे विचार येत होते. ही बाब त्याने आपल्या वडीलांसमोर बोलूनसुध्दा दाखवली होती. मात्र, वडिलांनी त्याची समजूत काढली.
 
असे असताना मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने कुणालने इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे टेरेसची चावी मागितली. त्यावेळी सुरक्षारक्षकाने चावी दिली नाही. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सुरक्षारक्षक इमारतीच्या टेरेसवर पाणी सोडण्यासाठी गेला असताना, त्याच्या पाठोपाठ कुणाल इमारतीच्या टेरेसवर गेला होता. यावेळी कुणालने सुरक्षारक्षकाची नजर चुकवून इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.