अलिबाग | तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावरील मानी फाटा येथे इनोव्हा कारचालकाने आज दुपारी एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नवेदर बेली येथील जोडप्याचा जागच मृत्यू झाला. विश्वास सदाशिव पाटील (वय ४७) आणि कल्पना विश्वास पाटील अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कारची तोडफोड केली तसेच रस्ता रोखून धरला होता.
नवेदर बेली येथील विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील हे दोघे दुपारी मोटोरसायकलने मांडवा येथे नातेवाईकांकडे मयत झाल्याने हाक मारण्याकरिता निघाले होते. मानी फाटा येथे समोरुन आलेल्या इनोव्हा कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक देत 500 मीटरपर्यंत या जोडप्याला फरफटत नेले. यात गंभीर जखमी होऊन विश्वास पाटील आणि कल्पना पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले. मोठा जमाव रस्त्यावर उतरला. या संतप्त जमावाने कारची तोडफोड करत अलिबाग-रेवस रस्ता रोखून धरला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अलिबाग पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
अपघातात मृत झालेल्या विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील यांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, या जोडप्याच्या अपघाती मृत्यूने नवेदर बेली गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरविल्याचे हळहळ व्यक्त केली जात आहे.